पावसाने फिरवली पाठ; शेतकरी हवालदिल !
खरिपाची पिके करपली कर्जाच्या बोजाने बळीराजा चिंताग्रस्त.
उंडाळे - प्रतिनिधी.
महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे अत्यन्त गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत सुकून जात असल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बँकेचे तसेच सावकारांचे कर्ज काढून, मोठा खर्च करून पेरण्या व लागवडी केल्या होत्या. मात्र, ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील गुंतवणूक अक्षरशः मातीत गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. पिके हातातून गेल्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च भागवणे अडचणीचा ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय कशी करायची? अशा चिंतेत शेतकरी सापडला आहे.खरिपाची पिके पूर्णपणे धोक्यात पावसाअभावी उंडाळे परिसर व सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस, सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग आणि उडीद यांसारखी महत्त्वाची खरीप पिके पूर्णपणे वाळून चालली आहेत. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची किंवा पिके हातातून पूर्णपणे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ऐन तोंडावर आलेला हंगाम वाया गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.


Post a Comment
0 Comments