Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

हजारोंना घडविणाऱ्या जेऊरच्या जिल्हा परिषद शाळेला अखेर वाचवणार कोण?

 हजारोंना घडविणाऱ्या जेऊरच्या जिल्हा परिषद शाळेला अखेर वाचवणार कोण?

शाळेची विद्यार्थीसंख्या घटली; अतिक्रमण व गैरवापराच्या तक्रारींची चौकशी करण्याची भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांची मागणी

करमाळा : प्रतिनिधी

करमाळा तालुक्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेऊर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, एकेकाळी हजारो विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने फुलणारे हे ज्ञानमंदिर आज अक्षरशः अखेरच्या घटका मोजत असल्याची खंत भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी व्यक्त केली आहे.या शाळेने जेऊर व परिसरातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मात्र आज शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने शाळेच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून शाळेच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.शाळेच्या चारही बाजूंनी अतिक्रमणांचा आरोपशाळेच्या चारही बाजूंनी अतिक्रमणे झाल्याच्या तक्रारी असून, काही ठिकाणी व्यापारी वापरामुळे शाळेचा परिसर आकुंचित होत असल्याचे कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. शाळेचा परिसर पार्किंग तसेच इतर गैरशैक्षणिक कारणांसाठी वापरला जात असल्याच्या तक्रारींचीही प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.शाळेची जागा आणि शैक्षणिक वातावरण सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शाळेच्या जागेची अधिकृत मोजणी करून अतिक्रमणे असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका कांबळे यांनी मांडली आहे.

'सरकारी शाळा वाचली तरच गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण वाचेल'

सरकारी शाळांची दुरवस्था होणे हा केवळ शिक्षण विभागाचा प्रश्न नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा ही शिक्षणाची महत्त्वाची आधारव्यवस्था आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय अथवा वैयक्तिक स्वार्थापेक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.

"ज्या शाळेने हजारो गरीब विद्यार्थ्यांना घडविले, ती शाळा अशी ओस पडताना पाहणे दुर्दैवी आहे. राजकारण आणि वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून जेऊरची जिल्हा परिषद शाळा वाचविण्याची गरज आहे. शाळेच्या जागेवरील अतिक्रमणांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि शाळेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रशासनाने ठोस कृती आराखडा तयार केला पाहिजे," अशी भूमिका उत्तरेश्वर कांबळे यांनी व्यक्त केली.

शाळा मतदान केंद्रापुरतीच मर्यादित राहणार का?

एकेकाळी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या शाळेच्या परिसरात आज शैक्षणिक वातावरणापेक्षा इतर वापर अधिक जाणवत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे ही शाळा केवळ मतदानाच्या वेळी वापरली जाणारी इमारत न राहता पुन्हा शिक्षणाचे केंद्र बनली पाहिजे, अशी मागणी होत आहे.प्रशासनासमोर आता खरी परीक्षा आहे.शाळेची जागा, अतिक्रमणांच्या तक्रारी, मूलभूत सुविधा, विद्यार्थीसंख्या आणि शैक्षणिक वातावरण याबाबत प्रशासनाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. दोषी कोणीही असो, नियमबाह्य बाबी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.जेऊरची जिल्हा परिषद शाळा ही केवळ चार भिंतींची इमारत नाही; ती हजारो सर्वसामान्य कुटुंबांच्या शैक्षणिक स्वप्नांची ओळख आहे.

आता प्रश्न एवढाच — या ज्ञानमंदिराला पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलविण्यासाठी प्रशासन ठोस पाऊल कधी उचलणार?

Post a Comment

0 Comments