अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा.
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘प्रतिथेंब अधिक पीक’ या उपक्रमांतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 10 ऑक्टोबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचासाठी कमाल पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत अनुदानाचा लाभ दिला जातो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी प्रति हेक्टरी कमाल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. उपलब्ध निधीतून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/agrilogin या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी. अर्जासाठी अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी, ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार अर्ज स्वीकारले जाणार आहेत.इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments