Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

शिरवळच्या पांडवदर्‍यातील बुद्ध लेणीवर पहिल्यांदाच भाद्रपद पौर्णिमा साजरी

 शिरवळच्या पांडवदर्‍यातील  बुद्ध लेणीवर  पहिल्यांदाच भाद्रपद पौर्णिमा साजरी 

सातारा - प्रतिनिधी.

     बौद्ध युवा जागृती परिषद कराड व सह्याद्री लेणी संवर्धक, वाई व भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा, यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवळच्या लयनगिरी बुद्ध लेणीवर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी बोलताना रोहित वाघमारे म्हणाले, शिरवळ च्या पांडवदऱ्यातील लयनगिरी बुद्ध लेणी हा प्राचीन बौद्धकालीन वारसा आहे. हा १७ लेण्यांचा समूह असून, एका लेणीत बौध्द चैत्यस्तूप आहे. चैत्यस्तुपाचे जोत, मेदी, वेदिकापट्टी,अंड, हार्मिका, पेटी, छत्र, छत्रावली, छत्रयष्टी असे विशिष्ट भाग असतात. तर चैत्यस्तूप, सारीरिक स्तूप, धम्मेक स्तूप, परिभोगिक स्तूप, ओटीव स्तूप असे प्रकार असतात. या लेणीमध्ये चैत्यगृह, चैत्यस्तूप, चैत्यविहार, शून्यागार, ध्यानकक्ष, पाण्याची पोडी आहेत.

     या बौध्द लेण्यांचा उल्लेख भोर संस्थानच्या तत्कालीन वस्तू संग्रहालयातील ताम्रपटात आढळतो. त्यानुसार राष्ट्रकूट वंशातील ध्रुव राजाने इसवी सन ७८० मध्ये दिलेल्या ताम्रपटात या बौध्द लेणीचे वर्णन आढळते. याशिवाय सदाशिव आत्माराम जोगळेकर यांच्या १९५२ च्या 'सह्याद्री' या पुस्तकातही या बुद्ध लेण्यांचा उल्लेख असून, या डोंगराला 'लयनगिरी' आणि शिरवळ गावाला 'श्रीमाळ, श्रीवलय, सिरीवलय' म्हणून ओळखत असल्याचे म्हटले आहे. अलीकडे त्याचे नाव पांडवदरा असे पडले.

     इसवी सनाच्या ५ ते १० व्या शतकात हा तीन मजली लेणीसमूह कोरलेला आहे.नंतरच्या काळात इथे शिवपिंडही बसवलेली दिसते, पिंडीच्या शेजारी चैत्यस्तूप व चैत्यगृह असून, पुढे चैत्यविहारात बौद्ध भिक्खूंसाठी आठ खोल्या कोरलेल्या दिसतात. सर्वात महत्त्वाचे वरील बाजूला मोठ्या आकाराचे चैत्यविहार आहे परंतु तिथे पाणी अडवल्याने पाण्याचे धोकादायक तळे झाले आहे. या लेण्यांची पुरेशी काळजी न घेतल्यामु‌ळे तिथे दगड, माती आणि झुडपांचे साम्राज्य आहे. या दुर्लक्षित बुद्ध लेणीचे जतन होणे आवश्यक आहे. केंद्र अथवा राज्य पुरातत्त्व विभाग आणि संबंधित शासकीय विभागाने जबाबदारीने लेण्यांची देखभाल करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

      या कार्यशाळेची कैलास कांबळे (कराड) व  रोहित वाघमारे (वाई) यांनी धुरा सांभाळली. कार्यशाळेसाठी भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका अध्यक्ष संजय जाधव, वाई तालुका अध्यक्ष महादेव शेलार, सह्याद्री लेणी संवर्धक समूहाचे संस्थापक अध्यक्ष अक्षय कांबळे,कार्यकर्त्यांनी महिनाभर प्रचार प्रसार केला.,उपस्थित, आनिल विर साहेब संजय कांबळे, आनंदा कांबळे, श्रीधर गोखले,आमोल वाघमारे, तानाजी कांबळे अनुराधा माने अमोल, प्रितम आढाव, स्वप्निल जाधव व शिरवळच्या राजे सिद्धार्थ तरुण मंडळाच्या किरण कांबळे विकी कांबळे लोकेश कांबळे व स्थानिक कार्यकर्त्यांनी ४०० लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली. यावेळी पोलीस प्रशासनासह, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     






Post a Comment

0 Comments