आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू श्रीशा जाधवचा एकता गणेश मंडळाकडून गौरव
आशियाई स्तरावर कांस्यपदकाची कमाई; मलकापुरात खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न - मनोहर शिंदे
कराड - प्रतिनिधी.
जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर स्केटिंग क्षेत्रात राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कराडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी श्रीशा सागर जाधव हिचा श्री एकता गणेश मंडळ, शास्त्रीनगर, मलकापूरच्या वतीने गौरव करण्यात आला. जागतिक विक्रमाची नोंद, आशियाई स्तरावरील कांस्यपदक, तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांतील कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.श्रीशा जाधव ही योगेश स्केटिंग अकॅडमी, कराडची खेळाडू असून, राष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक योगेश लोंढे यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. जून २०२१ मध्ये स्केटिंगचा सराव सुरू केलेल्या श्रीशाने अल्पावधीतच जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले. राष्ट्रीय रोलबॉल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने कांस्यपदक मिळविले. आईस स्केटिंग राज्य चॅम्पियनशिपमध्ये ३३३ व ५०० मीटर प्रकारात कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय आईस स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम ‘ब’ गटात प्रथम क्रमांक मिळवत आशियाई चाचणीसाठी निवड झाली. त्यानंतर आशियाई शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत तिने अंतिम ‘ब’ गटात कांस्यपदक मिळविले. टॅलेंट रेकॉर्ड बुक २०२४ मध्ये १ तास २४ मिनिटे २४ सेकंद नॉन-स्टॉप स्केटिंगची तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रम नोंद आहे. तिच्या कामगिरीची आशियाई व जागतिक रेकॉर्ड बुकमध्येही नोंद झाली आहे.यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, श्रीशासारख्या गुणवंत खेळाडूंचा गौरव इतर मुलांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रेरणा देतो. मलकापूरमधील खेळाडूंना सरावासाठी सर्व सोयींयुक्त, दर्जेदार व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेले मैदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष तानाजीराव देशमुख, रामेश्वर पाटील, संदीप शिंगण, तुकाराम मगदूम, मंगेश सुरवसे, राजेंद्र शिंगण, विजय देशमुख, विराज मगदूम, ऋषिकेश सुरवसे, अजय थोरात, रोहित माने, फारुख बागवान, किरण रोकडे, संभाजी शेडगे, बबन वास्के, शशिकांत सुरवसे, राहुल जाधव, संतोष मगदूम, राहुल केंगार, संजय सुरवसे, गणेश गोडगे, शिवाजी दनाने आदी उपस्थित होते.दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. चित्रकला, निबंध, वक्तृत्व, पारंपरिक वेशभूषा आदी स्पर्धांसह वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप आणि गड-किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘शिवमुद्रा’च्या दुर्गसंवर्धन कार्याचा गौरव.
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहिमेत योगदान देणाऱ्या शिवमुद्रा ट्रेकर्स, कराडच्या कार्याचीही यावेळी दखल घेण्यात आली. मंडळाच्या वतीने नगरसेवक दादासो शिंगण यांच्या हस्ते शिवमुद्राचे सदस्य राजेंद्र मोहिते, तानाजीराव देशमुख व जयवंत मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमर इंगवले, शेखर सोनवणे, राजेंद्र शिंगण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments