‘स्वतःचे पाप लपवण्यासाठी इतरांवर आरोप करणे म्हणजे बालिशपणा’; आदिनाथच्या प्रश्नावर उत्तरेश्वर कांबळेंचा घणाघात
करमाळा - प्रतिनिधी.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीवरून करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. आमदार नारायण आबा पाटील तसेच श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन नारायण आबा पाटील यांचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी प्रसिद्ध केलेली मुलाखत नुकतीच पाहिली. या मुलाखतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी नारायण आबा पाटील यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
“स्वतःची निष्क्रियता किंवा स्वतःचे पाप लपवण्यासाठी इतरांवर आरोप करणे योग्य नाही. आदिनाथची संपूर्ण परिस्थिती काय आहे, कारखान्याची आर्थिक आणि प्रशासकीय अवस्था काय आहे, तसेच स्वतःची राजकीय कुवत काय आहे, याची पूर्ण जाणीव असतानाही आता विरोधकांवर टीका करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हा निव्वळ बालिशपणा आहे,” असा घणाघात कांबळे यांनी केला.
पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, “तुम्हाला कारखाना चालवता आला नाही, हे मान्य करण्याची तयारी असली पाहिजे. कारखान्यात पुन्हा सोन्याचा धूर काढता आला नाही, हेही जनता पाहत आहे. मात्र कारखाना चालवता आला नाही, हे एकवेळ समजून घेता येईल; पण आदिनाथ विकण्याची वेळ आली असताना ते विकू दिल्याचे पाप कुठे फेडणार? या प्रश्नाचे उत्तर शेतकरी सभासद आणि तालुक्यातील जनतेला द्यावे लागेल.”
“तालुक्यातील जनता दूधखुळी नाही. अंधारात एखादा व्यवहार करायचा आणि नंतर जनतेसमोर येऊन आपणच त्याला विरोध करत असल्याचे नाटक करायचे, हे आता लोकांच्या लक्षात येणार नाही, असे समजू नका. तालुक्यातील जनता सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे,” असेही कांबळे यांनी म्हटले.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावरून भविष्यातील राजकीय दावे करण्यापूर्वी जनतेसमोर कारखान्याच्या सद्यस्थितीचा आणि आतापर्यंतच्या निर्णयांचा हिशेब मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली.
“कारखान्याचे वाटोळे होत असताना भविष्यात आमदार आम्हीच होणार, अशा फुकटच्या वल्गना करण्याचा प्रयत्न करू नका. जनता योग्य वेळी आपला निर्णय घेईल. येत्या काळात तालुक्यातील जनता कोणाला कुठे उभे करायचे, हे दाखवून देईल,” असा इशाराही कांबळे यांनी दिला.
‘स्वाभिमान असेल तर एकजुटीने आदिनाथ वाचवू’
दरम्यान, आदिनाथ कारखान्याच्या प्रश्नावर तालुक्यातील शेतकरी आणि सभासदांनी आता एकजूट दाखवण्याची गरज असल्याचे आवाहन कांबळे यांनी केले.
“करमाळा तालुक्यातील शेतकरी आणि आदिनाथचे सभासद यांच्यामध्ये जर थोडाफार स्वाभिमान शिल्लक असेल, तर हीच खरी वेळ आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन आदिनाथ वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई लढली पाहिजे. कारखाना आणि सभासदांचे हित अबाधित ठेवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर मार्गांचा वापर केला पाहिजे,” असे ते म्हणाले.
“गरज पडली तर करमाळा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरेल. वेळप्रसंगी चक्काजाम आंदोलनही करू; मात्र आदिनाथ वाचवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करू,” असा निर्धार व्यक्त करत कांबळे यांनी शेतकरी, सभासद आणि तालुक्यातील जनतेला एकजुटीचे आवाहन केले.
आदिनाथच्या प्रश्नावर आता केवळ आरोप-प्रत्यारोप न करता कारखान्याची वस्तुस्थिती, निर्णयप्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि सभासदांचे हित याबाबत पारदर्शकता आणावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


Post a Comment
0 Comments