उंब्रजमध्ये माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाला मारहाण.
जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले !
कराड - प्रतिनिधी.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अपिलीय निकालानुसार अर्जाची माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलेल्या नागरिकाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उंब्रज (ता. कराड, जि. सातारा) येथे घडली आहे. या प्रकरणी उंब्रज ग्रामपंचायतीचा कर्मचारी ओमकार जाधव आणि माजी सरपंच योगराज उर्फ माणिक शिवाजीराव जाधव यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसात दाखल तक्रारीवरून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज येथील हॉटेल व्यावसायिक रामदास दिलीप काटवटे (वय ३३) हे माहिती अधिकाराच्या प्रथम अपीलाच्या आदेशानुसार माहिती मिळवण्यासाठी 28 सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांचे मित्र खुरशिद खान यांच्यासोबत उंब्रज ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते.
ग्रामसेवक समाधान अंकुश माने हे त्यांच्या केबिनमध्ये आल्यानंतर रामदास काटवटे त्यांच्याकडे माहिती मागत होते. यावेळी त्यांचे मित्र खुरशिद खान हे मोबाईलवर या संवादाचे व्हिडिओ शूटिंग करत होते.व्हिडिओ शूटिंग सुरू असतानाच ग्रामपंचायत कर्मचारी ओमकार जाधव याने अचानक पाठीमागून येऊन खुरशिद खान यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. "तू कोणाच्या सांगण्यावरून व्हिडिओ शूटिंग करतोस?" असे विचारत त्याला कॉलरला धरून ओढत माजी सरपंच योगराज उर्फ माणिक जाधव यांच्याकडे नेले. तिथे या दोघांनी खुरशिद खान यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.आपल्या मित्राला वाचवण्यासाठी रामदास काटवटे मध्यस्थी करायला गेले असता, माजी सरपंच योगराज जाधव यांनी काटवटे यांना “ये खाटीका तुला काय करायचे ते तु कर” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली आणि धमकी दिली. तसेच त्यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांचा मोबाईल केबिनबाहेर फेकून दिला.घटनेनंतर रामदास काटवटे यांनी तातडीने 'डायल ११२' वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल भोसले (बॅच क्र. १४२७) हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तक्रारदारांना उंब्रज पोलीस ठाण्यात आणले.या प्रकरणी रामदास काटवटे यांच्या खबरी जवाबावरून उंब्रज ग्रामपंचायत कर्मचारी ओमकार जाधव आणि माजी सरपंच योगराज उर्फ माणिक शिवाजीराव जाधव यांच्याविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शासकीय कार्यालयातच घडलेल्या या गुंडगिरीच्या प्रकारामुळे उंब्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 या अंतर्गत माहिती मागवण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना दिलेला आहे ज्या नियमांना अधीन राहून माहिती नाकारली जाते ती माहितीही देशाच्या आणि समाजाच्या हिताची आणि विकासाची असते असं व्यापक स्वरूप या माहिती अधिकार अधिनियमाचा आहे. अधिकाराचा वापर करत असताना जर अशा पद्धतीने लोकसेवक व पद भूषवलेल्या व्यक्तीकडून अशा पद्धतीचे वर्तन होत असेल तर ते लोकशाहीस धोकादायक आहे. या कायद्यांतर्गत माहिती मागवली होती ती उंब्रज ग्रामपंचायत असलेले लोकसेवक ग्रामविकास अधिकारी यांना, नियमानुसार त्यांना ती द्यावयास हवी होती पण दिली नाही याच कारण काय ? कायद्यानुसार ज्या माहितींना देण्याचं बंधन केलेलं आहे अशी माहिती त्या माहिती अधिकार अर्जामध्ये मागितली होती का ? लोकसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी आपलं कर्तव्य न पार पाडल्यामुळे अर्जदारास अपिलात जावं लागलं आपली अधिकाऱ्यांनी माहिती पुरवावी असं आदेश नोंदवले असता अर्जदार माहिती आणायला गेल्यानंतर त्याच्यावर माहिती मागवल्याच्या कृतीवरून संबंधितांनी हल्ला केला. इतकी माहिती संवेदनशील आहे का या हल्ल्यामागे नक्की कुणाचा फायदा आणि कोणाचा तोटा कोण कोण यामध्ये मुख्य कोण सामील याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांच्या मध्ये होत आहे.


Post a Comment
0 Comments