फार्मसीच्या काउंटरपलीकडे फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची___ धरनी देसाई .
कराड - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म), घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी फार्मसीच्या काउंटरपलीकडे फार्मासिस्टची भूमिका या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात बिझनेस डेव्हलपमेंट अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या जनरल मॅनेजर धरनी देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी फार्मासिस्टची भूमिका केवळ औषध वितरणापुरती मर्यादित नसून, औषध उद्योग, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी, गुणवत्ता नियंत्रण, संशोधन, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये फार्मसी विद्यार्थ्यांसाठी रोजगार व करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.फार्मसी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक ज्ञानासोबत संवादकौशल्य, नेतृत्वगुण, व्यवस्थापन कौशल्य, टीमवर्क आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या फार्मसी क्षेत्रानुसार स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करून विविध करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून उपलब्ध असलेल्या विविध करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती मिळाली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.


Post a Comment
0 Comments