विद्यार्थ्यांनी करिअर इतकेच विवेकी व्यवहारास महत्व द्यावे - प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे
सातारा - प्रतिनिधी. भारतीय ज्ञान परंपरेत गुरु-शिष्य परंपरेस खूप मोठे स्थान आहे. आज शिक्षकांनी जागतिक बाजारपेठेला आवश्यक मनुष्यबळ तयार करताना आपला विद्यार्थी हा चांगला विवेकी माणूस म्हणूनही कसा घडेल यांकडे विशेष लक्ष द्यावे. शिक्षकांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणातील पदवी उत्तम पद्धतीने मिळविण्यासाठी मार्गदर्शन तर करावेच; मात्र विद्यार्थ्यांचा जीवन व्यवहार हा आदर्शवत कसा राहील यांकडे सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, सातत्य, कष्ट, संयम व गुरूंचे मार्गदर्शन घेऊन यशस्वी करिअर बरोबर चांगला नागरिक म्हणून घडण्यासाठी विवेकी जीवन व्यवहार आत्मसात करावा. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडिट) प्रिं. डॉ. राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो.डॉ.अनिलकुमार वावरे , राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. शिवाजीराव पाटील व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे समन्वयक व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डॉ. संदीप किर्दत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. मोरे यांनी इतिहासातील विविध उदाहरणे देत गुरुकुल पद्धती, तक्षशिला व नालंदा विद्यापीठातील शिक्षण परंपरा, इंग्रजांच्या काळातील शिक्षण , स्वातंत्र्योत्तर काळातील व एकविसाव्या शतकातील शिक्षण क्षेत्रावरती भाष्य केले. ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्क्रीन मध्ये व स्वतःमध्ये दंग न राहता समाजाचा विचार करावा. आपणांस आवडीच्या क्षेत्रात करिअर करत असताना नेहमी उच्च नैतिकता पाळत समाजाभिमुख काम करावे. आजचा काळ स्पर्धात्मक असला तरी सुद्धा परीक्षेतील गुणा इतकेच महत्व जीवन मूल्यांना द्यावे. समाज स्वास्थ्य चांगले राखण्याची जबाबदारी सरकार बरोबर शिक्षक व विद्यार्थ्यांची सुद्धा आहे. यावेळी प्रा. समीर सपकाळ, प्रा. डॉ. संदीप किर्दत व कु. श्रृति यादव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विद्यार्थिनी जुही ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या बागल हिने केले. प्रा. उद् यसिंह गायकवाड यांनी आभार मानले.


Post a Comment
0 Comments