“नवनवीन प्रयोगांनी शेतीला नवी दिशा देणारे प्रगतशील शेतकरी म्हणुन आपला ठसा उमटवणारा कर्तबगार माणूस आज काळाच्या पडद्याआड ”
कै. राजाराम ज्ञानू महारुगडे (राजा आप्पा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-
महारुगडेवाडी (ता. कराड)गावातील हुशार, प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी म्हणून आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे कै. राजाराम ज्ञानू महारुगडे (राजा आप्पा) यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.“राजा आप्पा” या नावाने ते संपूर्ण परिसरात परिचित होते. शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची धडपड, प्रत्येक गोष्ट स्वतः समजून घेण्याची जिज्ञासा आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी आपल्या काळातच एक वेगळी ओळख निर्माण केली होती.सन १९८० मध्ये त्यांनी जावा-बुलेट मोटारसायकल घेतली. त्या काळात गावाकडे अशी गाडी असणे हीच मोठी गोष्ट होती. मात्र आप्पांनी त्या गाडीचा उपयोग केवळ प्रवासासाठी न करता तिच्यावरही प्रयोग केला. गाडीला पंप जोडून विहिरीतून शेतासाठी पाणी उपसण्याचा अनोखा प्रयोग त्यांनी केला. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून अनेक लोक महारुगडेवाडी येथे येत असत.शेतीमध्येही त्यांची प्रयोगशीलता सतत दिसून येत असे. टोमॅटो पिकामध्ये वेगवेगळ्या नवीन जातींचे प्रयोग करून उत्पादन वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या काळात शेतीकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जात असे.नवीन गाडी घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी मोटारसायकलचे सर्व पार्ट स्वतः काढून बाजूला केले. गाडीमध्ये नेमके काय आहे, ती कशी चालते हे समजून घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण गाडी उघडून पुन्हा व्यवस्थित जोडली. दोनचाकी दुरुस्तीसाठी त्यांनी कधी गॅरेजचा आधार घेतला नाही.घरातील कोणतेही काम असो—लाईट फिटिंगपासून अनेक तांत्रिक कामांपर्यंत ते स्वतःच करत असत. स्वतःच्या बुद्धीवर आणि कौशल्यावर त्यांचा असलेला विश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत असे.सन १९९० च्या आसपास गावात पहिला टीव्ही आप्पांनी आणला. त्या काळात आप्पांच्या घरी रामायण मालिका पाहण्यासाठी गावातील लहान-थोर मंडळी मोठ्या उत्साहाने जमायची. पुढे चित्रपट पाहण्यासाठी त्यांनी गावात पहिला व्हिडिओ टीव्ही आणला. त्यानंतर गावात केबल नेटवर्क सिस्टिम आणण्याचेही पहिले श्रेय त्यांनाच जाते.आजच्या काळात या गोष्टी कदाचित साध्या वाटतील; पण त्या काळात गावासाठी त्या नवलाईच्या, कुतूहलाच्या आणि कौतुकाच्या गोष्टी होत्या. आणि त्या नवलाईला गावाच्या उंबरठ्यावर आणणारे राजा आप्पा होते.शेतीसोबतच गावाच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. गावाच्या विकासासाठी योगदान देत त्यांनी पाच वर्षे महारुगडेवाडी गावचे उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली.आप्पांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे जिज्ञासा, प्रयोगशीलता, कष्ट, आत्मविश्वास आणि सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड यांचा सुंदर प्रवास होता.त्यांच्या आठवणी सांगताना आजही त्यांच्या प्रयोगांची, त्यांच्या हुशारीची आणि त्यांच्या स्वभावाची अनेक उदाहरणे डोळ्यांसमोर उभी राहतात.काही माणसे जगातून निघून जातात; पण त्यांनी केलेली कामे, दिलेल्या आठवणी आणि माणसांच्या मनात निर्माण केलेले स्थान कधीच संपत नाही. राजा आप्पाही अशाच माणसांपैकी एक होते.आज राजा आप्पा आपल्यात नाहीत, ही जाणीव मनाला अत्यंत वेदना देणारी आहे. त्यांच्या अचानक जाण्याने महारुगडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावानेही एक कर्तबगार, हुशार, प्रयोगशील आणि आपुलकीचा माणूस गमावला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे आणि चार मुली असा मोठा परिवार आहे. परमेश्वर महारुगडे परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो आणि या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो.राजा आप्पांनी मागे ठेवलेल्या आठवणी, त्यांचे प्रयोग, त्यांचे कार्य आणि त्यांची माणुसकी सदैव स्मरणात राहील.कै. राजाराम ज्ञानू महारुगडे (राजा आप्पा) यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!


Post a Comment
0 Comments