विकसित राष्ट्राच्या उभारणीसाठी साक्षरतेचा भक्कम पाया असणे काळाची गरज__ डॉ. ए. बी. मुळीक.
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. ए. बी. मुळीक सहाय्यक प्राध्यापक, वेणूताई चव्हाण महाविद्यालय कराड हे होते. "भारतातील साक्षरता: वर्तमान स्थिती व भविष्यातील आव्हाने" या विषयावर बोलताना ते म्हणाले, विकसित राष्ट्राच्या उभारणीसाठी साक्षरतेचा भक्कम पाया असणे ही काळाची गरज आहे. देशातील महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून देशातील निरक्षर जनतेला शिक्षणाचा मार्ग दाखवला. यामध्ये महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांचे योगदान मोलाचे आहे. साक्षरता म्हणजे केवळ लेखन वाचन नव्हे तर याबरोबरच माहितीचे आकलन, विश्लेषण, डिजिटल साधनांचा वापर व निर्णय क्षमता यांचाही समावेश होतो. जगात आज साक्षरतेचे प्रमाण 87.74% आहे. तर भारतात हेच प्रमाण 83% पर्यंत आढळते. केरळ मिझोराम सारख्या राज्यात सर्वाधिक साक्षरता आहे तर बिहार आंध्र सारख्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. साक्षरतेच्या अभ्यासात महिला साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे कारण महिला स्वतः शिकते व कुटुंबालाही साक्षर करते. देशाचे उद्दिष्ट हे 100 साक्षरते बरोबर 100% सक्षम नागरिक घडवणे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, 2026 मध्ये साक्षरता ही लोकांसाठी पृथ्वीसाठी आणि समृद्धीसाठी आहे. अशी संकल्पना संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेली आहे. साक्षरतेमुळे मानवास सन्मान मिळतो. पर्यावरणाचे रक्षण होऊन शाश्वत विकास साधला जातो व राष्ट्राची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. माणूस साक्षरतेने लेखन वाचन करतो परंतु त्याला संस्काराची ही जोड असावी लागते. तरच तो सुशिक्षित म्हणून ओळखला जाईल. आपल्या सभोवतालच्या निरक्षर व्यक्तीला साक्षर करण्याचा उपक्रम या दिनाच्या निमित्ताने हाती घेतला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रा. से. यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ गवळी यांनी केला. आभार रा. से. यो. अधिकारी प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. सारिका लाटवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. सुभाष कांबळे,प्रा.विश्वनाथ सुतार, प्रा. जयदीप चव्हाण, प्रा.संदीप तुपे,प्रा. विनायक जाधव, प्रा. संभाजी पाटील, प्रा. दिपाली वाघमारे, सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments