Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

शेटफळच्या भीमनगरवरील हल्ला प्रकरणात १३ जणांना अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

 शेटफळच्या भीमनगरवरील हल्ला प्रकरणात १३ जणांना अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

अ. जा. ज.अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा; उत्तरेश्वर कांबळे यांची मोक्का कारवाईची मागणी — “बौद्ध वस्तीला तातडीने संरक्षण द्या”

सोलापूर - प्रतिनिधी

शेटफळ (ता. मोहोळ) येथील भीमनगर परिसरात २४ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी १३ जणांना अटक केली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना अवघ्या काही तासांत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलमांचा समावेश आहे. FIR नुसार ३७ व्यक्तींची नावे नमूद असून त्यांच्यासह इतर सुमारे १०० व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचा FIR मध्ये आरोप फिर्यादी अरविंद सिद्धेश्वर थोरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास भीमनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मोठा जमाव घराच्या दिशेने आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करून बाजूला सारल्याचा उल्लेख FIR मध्ये आहे. त्यानंतर घराची तोडफोड करून घरातील व्यक्तींना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, लोखंडी पाईप व लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली असून अनेक जण जखमी झाल्याचे नमूद आहे. एका व्यक्तीने लोखंडी पाईपने डोक्यात प्रहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेवर भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.अटक झाल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने तपासाला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, केवळ अटक आणि कोठडीपुरती कारवाई न थांबता हल्ल्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी, जमावाची भूमिका, पोलिसांशी झालेल्या कथित झटापटीपासून हल्ला आणि तोडफोडीपर्यंतच्या प्रत्येक बाबीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

“बौद्ध वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये”

कांबळे यांनी बौद्ध समाजाला आवाहन करताना मंदिर प्रवेशाच्या प्रश्नावरही भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जातीय तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीत धार्मिक स्थळांऐवजी बुद्ध विहार आणि आधुनिक बौद्ध धम्माच्या मूल्यांना प्राधान्य देण्याची भूमिका समाजाने घ्यावी.त्यांनी प्रशासनाकडे बौद्ध वस्तीला तातडीने आणि कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

“गावाला जातीयवादी ठरविण्यापूर्वी स्वतंत्र चौकशी आवश्यक”

कांबळे यांनी शेटफळ गावातील परिस्थितीवर कठोर शब्दांत प्रश्न उपस्थित केले असून, गावातील सामाजिक वातावरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.त्यांनी ग्रामपंचायतीचा निधी रोखावा आणि ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणीही केली आहे. मात्र, अशा प्रशासकीय कारवाईसाठी सक्षम प्राधिकरणाकडून स्वतंत्र चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे.

आता पोलिसांच्या तपासाची खरी कसोटी

FIR मध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप नोंदविले गेले आहेत आणि पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याने तपास यंत्रणेसमोर आता अनेक प्रश्न आहेत—

हल्ल्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती? जमाव किती मोठा होता? पोलिसांना अडथळा आणल्याचा आरोप कितपत सत्य आहे? मारहाणीत कोणाची नेमकी भूमिका होती? जातिवाचक शिवीगाळीचे आरोप सिद्ध होतात का? आणि या संपूर्ण घटनेमागे आणखी कोणाची भूमिका आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरे निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित तपासातूनच समोर येणे अपेक्षित आहे.असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले

Post a Comment

0 Comments