पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सोलापूर विद्यापीठात जनजागृती
‘ग्रीन बप्पा – हरित भविष्याचा संकल्प’ उपक्रम उत्साहात संपन्न
सोलापूर - प्रतिनिधी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस (भूशास्त्र संकुल) अंतर्गत पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने ‘ग्रीन बप्पा – हरित भविष्याचा संकल्प’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमाच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयावर स्वनिर्मित पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित केले. यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव, निर्माल्य व्यवस्थापनाचे महत्त्व तसेच नैसर्गिक माती व रंगांचा वापर याबाबत जनजागृती करण्यात आली.दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी शाडू माती व नैसर्गिक काळ्या मातीपासून हाताने गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमात पर्यावरणशास्त्र, भूमाहितीशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या विभागातील २५ हून अधिक विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याची जाणीव निर्माण करणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.कार्यक्रमादरम्यान भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करताना, सण-उत्सवांच्या परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जाणीव आणि शाश्वत जीवनशैलीचा दृष्टिकोन विकसित होतो, असे त्यांनी नमूद केले.हा उपक्रम विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. मंगेश वेदपाठक यांनी जबाबदारी सांभाळली.या उपक्रमातून ‘परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया’ हा पर्यावरणपूरक संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.




Post a Comment
0 Comments