Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

महसूल अधिकाऱ्यांकडून महिलेचा कथित जातीय अपमान? करमाळ्यात खळबळ; संशयित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची भीम आर्मीची मागणी

 महसूल अधिकाऱ्यांकडून महिलेचा कथित जातीय अपमान? करमाळ्यात खळबळ; संशयित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची भीम आर्मीची मागणी

‘सर्वांसमोर अपमान, धमकी आणि जातीय अवमान’ केल्याचा आरोप; मंडळ अधिकारी व तलाठ्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल

करमाळा - प्रतिनिधी

करमाळा तहसील कार्यालयातील एका शासकीय बैठकीदरम्यान महिलेचा कथितरित्या जातीय अपमान करून तिला धमकावल्याच्या गंभीर आरोपांनी करमाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी राजकुमार पांडेकर आणि तलाठी गोरक्षनाथ ढोकणे यांच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करमाळा तहसील कार्यालयात आयोजित शासकीय बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. बैठकीत उपस्थित असताना संबंधित महिलेने आपल्या म्हणण्याप्रमाणे कामकाजाबाबत भूमिका मांडली. त्यावेळी आरोपींपैकी एका अधिकाऱ्याने तिच्याशी अरेरावी केली, तसेच तिच्या जातीचा उल्लेख करून सर्वांसमोर अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे त्या महिलेचा सर्वांसमोर अपमान झाला. परिस्थिती चिघळल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांकडून धमकीवजा वक्तव्य करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे संबंधित महिलेला मानसिक धक्का बसल्याचे तिच्या जबाबात सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर संबंधित महिलेने वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे प्रकरण मांडले होते. चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने अखेर १० सप्टेंबर २०२६ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, अशी नोंद FIR मध्ये आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७५, ३५१(२), ३५२, ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम ३(१)(w)(i), ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(va) अंतर्गत गुन्हा नोंदविल्याचे FIR मध्ये स्पष्ट आहे. तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्याकडे सोपविण्यात आल्याचेही नमूद आहे. 

‘केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही’ — भीम आर्मी

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासकीय पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच एखाद्या महिलेचा जातीय अवमान आणि धमकीवजा वर्तन झाल्याचा आरोप समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.“या प्रकरणात केवळ गुन्हा दाखल करून प्रशासनाने हात झटकू नयेत. तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित संशयित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे,” अशी मागणी उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागणे अपेक्षित असते. मात्र जर पदाचा अधिकार वापरून एखाद्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी अपमानित व धमकावल्याचे आरोप खरे ठरले, तर ही केवळ एका व्यक्तीची बाब न राहता प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना ठरेल, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.त्यामुळे या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, तक्रारदार महिलेचे संरक्षण व सन्मान कायम ठेवावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments