Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

करमाळ्याच्या राजकारणाला सक्षम विरोधी गटाची गरज !

 करमाळ्याच्या राजकारणाला सक्षम विरोधी गटाची गरज !

सत्तेच्या सावलीत विरोधकांची भूमिका बोथट; शेतकरी, बेरोजगार आणि विकासकामे वाऱ्यावर :उत्तरेश्वर कांबळे

सोलापूर - प्रतिनिधी.

 करमाळा तालुक्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषाच धूसर झाली असून, जनतेच्या प्रश्नांसाठी सक्षम, आक्रमक आणि स्वतंत्र विरोधी गटाची नितांत गरज आहे, असे मत भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी व्यक्त केले.सध्याची करमाळा तालुक्याची राजकीय परिस्थिती राज्यातील राजकारणापेक्षा फारशी वेगळी नाही. विद्यमान आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे असले तरी सत्ताधारी भाजपसोबत त्यांचे जवळचे संबंध असल्याचे अनेकदा दिसून येते. मतदारसंघाला निधी मिळावा या अपेक्षेने ते सत्तेच्या वर्तुळात वावरत असल्याचा आरोप कांबळे यांनी केला.तालुक्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची अवस्था गंभीर असून, तो सुरू करण्यासाठी आमदार नारायण पाटील विविध भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचेही कांबळे यांनी सांगितले. मात्र, आमदारकीच्या कार्यकाळात ठोस विकासकामे आणि निधीचा प्रभावी पाठपुरावा झालेला दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.तहसीलदारांविरोधात हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित करून बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी संदर्भ देत, “सत्तेच्या जवळ असूनही आपल्या मतदारसंघातील प्रशासकीय प्रश्न प्रभावीपणे सोडवता येत नसतील, तर ही राजकीय ताकद नेमकी कुठे वापरली जाते?” असा सवाल उपस्थित केला.माजी आमदार संजयमामा शिंदे हे सत्ताधारी आघाडीचा भाग असल्याने सरकारला दुखावू नये या भूमिकेतून प्रभावी विरोधकाची भूमिका बजावत नसल्याचे कांबळे म्हणाले. तर बागल गटाचे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने ते सत्तेत आहेत की विरोधात, याबाबत जनतेमध्ये संभ्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेबाबतही स्पष्टता नसल्याची टीका त्यांनी केली.“तालुक्यात सत्तेत कोण आणि विरोधात कोण, हेच जनतेला कळेनासे झाले आहे. सर्वच राजकीय नेते आपापल्या सोयीनुसार सत्तेला दुखवू नये, अशी भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा सक्षम विरोधक निर्माण होणे ही काळाची गरज आहे,” असे कांबळे यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, विजेची समस्या, सुशिक्षित बेरोजगारी आणि नवीन उद्योग-व्यवसायांना पोषक वातावरणाचा अभाव यामुळे करमाळा तालुक्याच्या विकासाला खीळ बसल्याचा दावा त्यांनी केला.

“करमाळ्याला आता केवळ राजकीय नेते नकोत, तर जनतेच्या प्रश्नांसाठी सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून जाब विचारणारा सक्षम विरोधक हवा. अन्यथा सत्तेच्या आणि राजकीय सोयीच्या या खेळात करमाळा तालुका विकासाच्या शर्यतीत मागे पडत राहील,” असा इशाराही उत्तरेश्वर कांबळे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments