भोंदू मनोहर भोसलेच्या अघोरी कमाई विल्हेवाट प्रकरणात दत्तकला संस्थेची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी : उत्तरेश्वर कांबळे
सोलापूर - प्रतिनिधी.
भोंदू मनोहर भोसले याने अघोरीकृत्यातून अमाप माया जमा केली होती त्याची विल्हेवाट रामदास झोळ याच्या दत्तकला शिक्षण संस्था व तिच्याशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांवरून निर्माण झालेल्या वादाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित न ठेवता संस्थेतील आर्थिक व्यवहार, कथित पैशांची देवाणघेवाण, कागदपत्रे, रजिस्टर, संगणकीय नोंदी तसेच संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे.या प्रकरणासंदर्भात विविध वृत्तपत्रांतून गंभीर स्वरूपाचे आरोप व पोलिस तपासातील माहिती प्रसिद्ध झाली आहे. काही व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्याचे, अटक झाल्याचे तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. तपासादरम्यान संस्थेशी संबंधित कागदपत्रे, रजिस्टर व संगणक जप्त करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.मात्र, “एवढ्यावरच तपास थांबवून चालणार नाही,” असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील, पैशांचा स्रोत, पैशांची कथित विल्हेवाट, संस्थेतील निर्णयप्रक्रिया आणि या प्रकरणामागे आणखी कोणाची भूमिका आहे का, याचा तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“फक्त व्यक्तींवर कारवाई नको; संपूर्ण यंत्रणेची चौकशी करा”
उत्तरेश्वर कांबळे म्हणाले, “या प्रकरणात कोण दोषी आहे आणि कोण निर्दोष आहे, हे न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होईल. मात्र संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी तपास निष्पक्ष असणे आवश्यक आहे. संस्थेच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांबाबत जर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असतील, तर त्याची मुळापासून चौकशी झाली पाहिजे.”
“स्थानिक पातळीवरील तपासाबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील, तर त्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी CBIसारख्या स्वतंत्र केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करणे हाच योग्य मार्ग आहे,” असेही कांबळे यांनी स्पष्ट केले.
“शिक्षण संस्थेच्या नावावर काळेबेरे चालणार नाही”
शिक्षण संस्था म्हणजे पालक, विद्यार्थी आणि समाजाच्या विश्वासाची जागा आहे. त्यामुळे संस्थेच्या नावावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार किंवा अनियमितता झाली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई आणि निर्दोष असेल त्याला न्याय, अशी भूमिका कांबळे यांनी मांडली.या प्रकरणातील सर्व कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
“CBI चौकशी झालीच पाहिजे”
“हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे की त्यामागे मोठे आर्थिक आणि प्रशासकीय जाळे आहे, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि तपासावर पूर्ण विश्वास निर्माण करण्यासाठी CBI चौकशी झालीच पाहिजे,” असा आक्रमक इशारा भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी दिला.
दरम्यान, या मागणीमुळे करमाळा तालुका व दत्तकला शिक्षण संस्था या प्रकरणाची राजकीय व सामाजिक पातळीवर पुन्हा चर्चा सुरू झाली असून, शासन या मागणीवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments