मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' संदर्भात बैठक.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ.
मुंबई :- ब्युरो रिपोर्ट.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाइन लाभ वितरणास प्रारंभ करण्यात आला.राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून, शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,207 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ₹5029 कोटींची रक्कम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळेल.ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून, ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावे, एवढी सहज आणि सोपी प्रक्रिया असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी अथवा प्रलंबित बाबी असतील, त्या संबंधित पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून द्याव्यात, त्या सर्व विषयांवर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातील विभागनिहाय माहिती अमरावती विभागात - 1,58,146 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ₹1372.17 कोटींचा लाभ,नाशिक विभाग - 1,40,089 शेतकऱ्यांना ₹1209.39 कोटींचा लाभ.छत्रपती संभाजीनगर विभाग- 1,30,934 शेतकऱ्यांना ₹932.61 कोटींचा लाभ.
पुणे विभाग - 1,04,061 शेतकऱ्यांना ₹860.97 कोटींचा लाभ.नागपूर विभाग - 70,290 शेतकऱ्यांना ₹544.71 कोटींचा लाभ.कोकण विभाग - 18,687 शेतकऱ्यांना ₹108.86 कोटींचा लाभ.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री, मान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments