अतिरिक्त लोकसंख्या वाढ नियंत्रण म्हणजेच विकसित राष्ट्राचा पाया होय; डॉ.विजयकुमार जवान.
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अर्थशास्त्र विभाग व भूगोल विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती डॉ. विजयकुमार जवान भूगोल विभाग प्रमुख, एस.जी.एम. महाविद्यालय कराड हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले कोणत्याही राष्ट्राची अतिरिक्त लोकसंख्या वाढीचे नियंत्रण म्हणजेच विकसित राष्ट्राचा पाया होय. लोकसंख्या अतिरिक्त झाल्यास राष्ट्राच्या साधन संपत्ती वरती ताण येतो. नागरिकांच्या गरजांचा पुरवठा करण्यास राष्ट्र असमर्थ ठरते. त्यामुळे सर्वांगीण विकास होण्यास अडथळा निर्माण होतो. लोकसंख्या वाढीच्या दरावरती नियंत्रण असेल तर साधन संपत्तीचे वाटप व संवर्धन करणे सुलभ होते. कमावती लोकसंख्या जास्त असलेल्या राष्ट्रांना प्रगती साधता येते. परंतु अनुउत्पादित परावलंबी लोकसंख्या जास्त असेल तर विकास होण्यास अडथळा निर्माण होतो. भारतासारख्या देशाकडे सर्वात जास्त युवकांची संख्या आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत विकसित राष्ट्र होऊ शकेल परंतु त्याबरोबरच वाढणारी अतिरिक्त लोकसंख्या नियंत्रित असणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ . सतीश घाटगे होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, आज जगासमोर लोकसंख्या वाढीचा प्रश्न गंभीर आहे. दिवसेंदिवस जगाची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साधन संपत्तीवर मोठा ताण आलेला आहे. लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने लोकांना जागृत करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मारुती सूर्यवंशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दीपक गुरव यांनी केला. आभार प्रा.सुरेश काकडे यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले या कार्यक्रमासाठी ज्युनिअर विभागाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. बाजीराव देसाई, प्रा.सचिन बोलाईकर,प्रा सुरेश रजपूत व सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनात श्री सुनील गुजर व पंकज कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Post a Comment
0 Comments