कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून कापूसखेड येथे 'पीआरए' (PRA) व समस्यायुक्त जमिनीच्या सुधारणेबाबत प्रात्यक्षिक सादर!
कासेगाव - प्रतिनिधी.
रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी 'ग्रामीण कृषी कार्यानुभव' (RAWE) कार्यक्रमांतर्गत कापूसखेड येथे 'कृषी ग्राम शोध मोहीम' (Participatory Rural Appraisal - PRA) आणि 'समस्यायुक्त जमीन व तिची सुधारणा' या विषयावर यशस्वी गटचर्चा व प्रात्यक्षिक आयोजित केले होते.
गावातील स्थानिक सिद्धनाथ मंदिराच्या प्रांगणात हा माहितीपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडला. यावेळी कृषी दूतांनी कापूसखेड ग्रामस्थांसमोर गावाचा सविस्तर आणि रंगीबेरंगी 'नकाशा' (Village Map) सुंदर रांगोळीच्या माध्यमातून रेखाटला, ज्याने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
समस्यायुक्त जमिनीचे व्यवस्थापन व 'जिप्सम फिल्टरेशन'चे थेट प्रात्यक्षिक
गटचर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतीसमोरील मुख्य आव्हान असलेल्या क्षारयुक्त, चोपण व अल्कधर्मी (Problematic Soils) जमिनींविषयी सविस्तर माहिती दिली. जमिनीमध्ये येणाऱ्या विविध समस्या, त्यांची कारणे आणि त्यावर करायच्या उपाययोजना यावर उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे चोपण किंवा अल्कधर्मी जमिनीची सुधारणा कशी करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी करून दाखवलेले 'जिप्सम फिल्टरेशन'चे (Gypsum Filtration) जिवंत प्रात्यक्षिक (Experiment). या प्रयोगाद्वारे चोपण मातीतून जिप्समच्या साहाय्याने पाण्याचा निचरा कसा सुधारतो आणि हानिकारक क्षार कसे वाहून जातात, हे शेतकऱ्यांना थेट दाखवण्यात आले.
हा यशस्वी उपक्रम महाविद्यालयाचे विद्यार्थी वरदराज पाटील, राजवर्धन थोरात, शिवम शिंदे, इंद्रजित पासले, संकेत पाटील, रोशन गावित, राजदीप सावंत आणि सत्यजित जगताप यांनी राबवला. या कृषी दूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य, रावे समन्वयक प्रा. दिपक भिलवडे व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे प्रा.अमोल आडके व विषयतज्ज्ञ प्रा.सुवर्णा पोदार यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या मार्गदर्शनामुळे आणि थेट प्रयोगांमुळे कापूसखेड येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील चोपण जमिनी सुधारण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला असून, सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.



Post a Comment
0 Comments