Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

 नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

"जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ"

"गांजा व अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी पोलीस विभागाकडून संपर्क क्रमांक कार्यान्वित"

कोल्हापूर, दि. १३ : जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, गांजा यांसारख्या मादक पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले असून, याचे विनाशकारी परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला पोखरत आहेत. या पार्श्वभूमीवर सदृढ समाज निर्मितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष संयुक्त प्रशासकीय बैठकीत त्यांच्या हस्ते या महत्त्वाच्या अभियानाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आमदार अशोक माने, इचलकरंजी महानगरपालिका महापौर उदय धातुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, कोल्हापूर महानगरपालिका उपआयुक्त रवीकांत अडसूळ यांच्यासह जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते; तर इतर लोकप्रतिनिधी, तालुका स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अभियानाचा आराखडा सादर केला. त्यानंतर पोस्टरचे अनावरण करून नशामुक्त अभियानाची घोषणा करण्यात आली. अभियानाच्या नियोजन, अंमलबजावणी व जबाबदारी निश्चितीसाठी पालकमंत्री महोदयांच्या मुख्य समन्वयाखाली सर्वसमावेशक ‘संयुक्त कृती दलाची’ निर्मिती करण्यात येत असून, या मोहिमेचा नियमित आढावा प्रत्येक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.गांजा व अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी पोलीस विभागाकडून ९८२२७६६१०० हा संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला अत्यंत कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले असून, गांजा व तत्सम मादक पदार्थांची तस्करी व पुरवठा साखळी पूर्णपणे मोडून काढण्यासाठी ‘शून्य सहनशीलता’ (झिरो टॉलरन्स) धोरण राबविण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याने यात उत्कृष्ट कार्य करीत हे अभियान राज्यस्तरावर राबविले जाईल असे काम करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचू नयेत यासाठी शाळा, महाविद्यालये आणि आयटीआय परिसराभोवती १०० मीटरचा परिघ पूर्णपणे व्यसनमुक्त व निर्बंधित करून, या सुरक्षित कवचात येणाऱ्या सर्व पानटपऱ्या व अवैध दुकानांवर तात्काळ कायदेशीर निर्बंध घालण्याचे आदेश त्यांनी पोलीस व स्थानिक प्रशासनाला दिले.याशिवाय, केवळ कारवाईवर भर न देता लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यासाठी पोलीस विभागामार्फत सर्वाधिक अमली पदार्थांचा पुरवठा होणाऱ्या प्रभागांची निश्चिती केली जाईल. स्थानिक आमदार, खासदार व नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभांमध्ये ठराव करून ‘नशामुक्त वॉर्ड’ तसेच ‘नशामुक्त ग्रामपंचायत’ संकल्पना यशस्वी करणाऱ्यांना शासनाच्या वतीने प्रोत्साहनात्मक बक्षिसे दिली जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.या अभियानाचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे विद्यार्थ्यांचे मानसिक परिवर्तन आणि व्यापक जनआंदोलन होय. याची सुरुवात येत्या १५ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी होणार आहे. या दिवशी सर्व शाळांमध्ये मान्यवर व लोकसेवकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सामूहिक नशामुक्तीची शपथ दिली जाईल. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमित ‘संस्कार भारती’ वर्गांचे आयोजन केले जाईल. तसेच तरुणांना निरोगी जीवनशैलीकडे वळविण्यासाठी क्रीडा विभागातर्फे भव्य प्रभातफेरी व ‘रन फॉर नशामुक्त कोल्हापूर’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येईल.पोलीस, महसूल, शिक्षण, आरोग्य व स्थानिक प्रशासनासह सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे कार्य करून संपूर्ण जिल्ह्याला एकाच छत्राखाली आणावे, हे अभियान यशस्वी करावे आणि कोल्हापूरला पूर्णपणे नशामुक्त करावे, असे आग्रही आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शेवटी केले. बैठकीत मनपा महापौर रूपाराणी निकम, महापौर उदय धातुंडे, नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी या अभियानात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी कठोर भूमिका घेत पारदर्शक पद्धतीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच संपूर्ण अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले. 



Post a Comment

0 Comments