प्रमोद मोरे यांचा 'पर्यावरणरत्न' पुरस्काराने गौरव.
उंडाळे - प्रतिनिधी.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आणि स्वर्गीय 'वृक्षमित्र' आबासाहेब मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, 'निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य' आणि 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहमदनगर' यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री प्रमोद (दादा) मोरे यांना त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल 'पर्यावरणरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि सामाजिक प्रदूषण निवारण या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी लावलेल्या रोपवाटिकेतून आज एक विशाल वटवृक्ष निर्माण झाला आहे. या पवित्र कार्याचा वारसा श्री प्रमोद (दादा) मोरे अत्यंत समर्थपणे आणि निष्ठेने पुढे नेत आहेत. केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतून त्यांनी उभी केलेली पर्यावरण चळवळ आज संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारली असून, हे मंडळ हरित क्रांतीचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य यशस्वीपणे सुरू आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगद, अहमदनगर माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, श्री प्रभाकर म्हस्के, छायाताई राजपूत, मंडळाचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर तसेच सौ. मीनाक्षी मोरे, सचिव सौ. वनश्रीताई मोरे गुणवरे यांच्यासह राज्यभरातील विविध पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त डॉ. अनिल लोखंडे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
पर्यावरण जनजागृतीचे आवाहन सत्काराला उत्तर देताना श्री प्रमोद (दादा) मोरे म्हणाले, "पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या कार्यक्षेत्रातून वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिक मुक्त समाजासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे." कार्यशाळेत शाश्वत विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.


Post a Comment
0 Comments