Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

प्लास्टिक प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवाधारित अभिनव संशोधन; पंकज सुतकर यांना पर्यावरणशास्त्र विषयात पीएच.डी.

  पंकज सुतकर यांना पर्यावरणशास्त्र विषयात पीएच.डी.

प्लास्टिक प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवाधारित अभिनव संशोधन.

सोलापूर- प्रतिनिधी.

 वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या जागतिक समस्येवर पर्यावरणपूरक उपाय शोधण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण संशोधन कार्य पूर्ण करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलातील पर्यावरणशास्त्र विभागाचे संशोधक पंकज रमेश सुतकर यांना पर्यावरणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी "Study of Biodegradation of Disposable Plastics Using Naturally Adapted Bacteria and Fungi from Soil" या विषयावर संशोधन पूर्ण केले असून हे संशोधन पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील एक उल्लेखनीय योगदान मानले जात आहे.हे संशोधन भूशास्त्र संकुलाचे संचालक व पर्यावरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विनायक पी. धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या मृदा, जल आणि परिसंस्थेवरील दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर संशोधकांनी सोलापूर परिसरातील मातीमधून नैसर्गिकरित्या प्लास्टिकशी जुळवून घेतलेल्या जीवाणू व बुरशींचे विलगीकरण करून त्यांच्या प्लास्टिक विघटन क्षमतेचा सखोल अभ्यास केला.संशोधनात PET, PP, LDPE आणि PS या प्रमुख डिस्पोजेबल प्लास्टिक प्रकारांच्या जैवविघटन प्रक्रियेचे परीक्षण करण्यात आले. यासाठी सूक्ष्मजीवांची आण्विक ओळख, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी (SEM), गॅस क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री (GC-MS) यांसारख्या अत्याधुनिक संशोधन तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला. अभ्यासातून अनेक सूक्ष्मजीवांमध्ये प्लास्टिक विघटनाची उल्लेखनीय क्षमता असल्याचे सिद्ध झाले.या संशोधनातील विशेष उपलब्धी म्हणजे प्लास्टिक विघटनक्षम आठ नवीन सूक्ष्मजीवांची ओळख पटवून त्यांची नोंद जागतिक स्तरावरील NCBI GeneBank अमेरिका या आंतरराष्ट्रीय डेटाबेसमध्ये करण्यात आली आहे. या नव्या सूक्ष्मजीवांना सोलापूर आणि विद्यापीठाशी निगडित नावे देण्यात आली आहेत. याशिवाय प्लास्टिक कचऱ्याच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी प्रयोगशाळा स्तरावर जैवविघटन प्रणाली विकसित करण्यात आली असून प्लास्टिक विघटन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविणारा बायोरिअक्टर देखील विकसित करण्यात आला आहे. या संशोधनाशी संबंधित ०३ पेटंट्स संशोधकांच्या नावावर नोंद करण्यात आले आहेत.संशोधन कालावधीत पंकज सुतकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ०९ आणि राष्ट्रीय स्तरावरील ०२ संशोधन निबंध प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर करून पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.पीएच.डी. प्रबंधाच्या सार्वजनिक सादरीकरण व खुल्या विवामध्ये डॉ. प्रशांत पवार आणि डॉ. संजयकुमार थोरात यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी डॉ. प्रियांका धुळप, श्री.रमेश सुतकर, विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता, शिक्षकवर्ग आणि संशोधकांनी पंकज सुतकर तसेच त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. विनायक धुळप यांचे अभिनंदन करून भविष्यातील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत पर्यावरण व्यवस्थापनासाठी हे संशोधन भविष्यात उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments