संजय गांधी योजनेच्या अनुदानासाठी हयातीचे दाखले काढण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन.
कराड - प्रतिनिधी.
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आदी योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी आपले हयातीचे दाखले तातडीने काढावेत, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
तहसीलदार बाजीराव पाटील व संजय गांधी शाखेच्या नायब तहसीलदार श्रीमती. कल्पना ठवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शासनाच्या विविध विशेष सहाय्य योजनांचा लाभ नियमितपणे मिळत राहण्यासाठी लाभार्थ्यांनी हयाती पडताळणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
७ मे २०२६ पासून हयाती पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लाभार्थ्यांना त्यांच्या जवळील महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच शासनाने उपलब्ध करून दिलेल्या Beneficiary Satyapan App (BSA) या मोबाईल अँपच्या माध्यमातून लाभार्थी स्वतःही पडताळणी करू शकतात. या दाखल्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, ५० वर्षांखालील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला, ५० वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी प्रत्येक पाच वर्षांनी एकदा उत्पन्नाचा दाखला,लाभार्थ्यांनी हयाती प्रमाणपत्राची छायांकित प्रत व उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत तहसील कार्यालय, कराड येथे जमा करावी. निवृत्ती वेतनाचा लाभ नियमितपणे मिळण्यासाठी २५ जून २०२६ पूर्वी हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास विशेष सहाय्य योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच निराधार लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Post a Comment
0 Comments