भोंदू वीरकर उर्फ “कासव बाबा” प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा.
टेंभुर्णी पोलिसांवर विश्वास नाही – भीम आर्मी
सोलापूर :- प्रतिनिधि.
सोलापूर जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदू वीरकर उर्फ “कासव बाबा” प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलिसांकडे न ठेवता विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनात टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, “टेंभुर्णी पोलिसांवर काडीमात्र भरोसा राहिलेला नाही,” असा थेट आरोप करण्यात आला आहे. काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे स्वतः भोंदू वीरकर उर्फ कासव बाबाचे भक्त असल्याने तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तत्कालीन टेंभुर्णी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दीपक पाटील व नारायण पवार हे भोंदू बाबा विरकर यांचे भक्त होते असा गंभीर स्वरूपाचा निवेदन करते यांनी आरोप केला आहे तसेच त्यांच्या निलंबनाची देखील मागणी केली आहे त्यामुळे संबंधित प्रकरणावरती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी एकंदरीत काय भूमिका घेतात याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
भीम आर्मीच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपानुसार, भोंदू वीरकरला तपासासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असता मोठ्या प्रमाणात त्याचे भक्त पोलीस स्टेशनच्या गेटवर जमा झाले होते. एवढेच नव्हे तर काही भक्त थेट पोलीस स्टेशनच्या आत जाऊन पोलिसांच्या समोरच भोंदू बाबाच्या पाया पडत असल्याचे प्रकार घडले. या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस यंत्रणेकडून भोंदू बाबाला अप्रत्यक्ष सहकार्य केले जात असल्याचा संशय अधिक बळावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा आणि प्रभावशाली लोकांच्या संपर्कांचा वापर करून मोठे जाळे निर्माण करण्यात आल्याची चर्चा सुरू असून, स्थानिक स्तरावरील तपास निष्पक्ष होईल का, याबाबत नागरिकांमध्येही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याच्या गृहमंत्रालयाने स्वतंत्र SIT कडे सोपवावी, तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिकाही तपासण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, “कासव बाबा” प्रकरणामुळे टेंभुर्णीसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments