भूशास्त्र संकुलात ‘Career Horizons 2026’ ब्रिज कोर्सला उत्साहात सुरुवात.
सोलापूर - प्रतिनिधी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील भूशास्त्र संकुलामार्फत पी.एम. उषा (प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान) मेरू अंतर्गत आयोजित “करियर होरायझन २०२६: भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र व भू-माहितीशास्त्रातील करिअर संधी” या द्वितीय ब्रिज कोर्सचा उद्घाटन समारंभ रंगभवन, सोलापूर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भू-माहितीशास्त्र हे विषय परस्परांशी घट्ट जोडलेले असून त्यांचा एकत्रित उपयोग विविध क्षेत्रांत होत असल्याचे स्पष्ट केले. स्मार्ट सिटी, ड्रोन तंत्रज्ञान, गतिशीलता व्यवस्थापन, शासकीय प्रकल्प तसेच न्यायव्यवस्था अशा विविध क्षेत्रांत या विषयांमधील करिअर संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून श्री. विनायक साळुंखे (मुंबई), श्री. नितीन माळी (आकाशे प्रा. लि., मुंबई) आणि श्री. गणेश बुरांडे (इन्फोसिस, हैदराबाद) उपस्थित होते.
या दोन दिवसीय ब्रिज कोर्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भू-माहितीशास्त्र क्षेत्रातील आधुनिक करिअर संधी, संशोधन दिशा आणि उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्यांविषयी मार्गदर्शन करणे हा आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच संकुलाची माहिती संचालक डॉ. विनायक धुळप यांनी केली. समन्वयक म्हणून श्री. महेश कंदी व श्री. सिद्धाराम चौगुले यांनी कार्य पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतिश धेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. महेश कंदी यांनी केले.
उद्घाटन सत्रानंतर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र पार पडले. श्री. विनायक साळुंखे यांनी “हरित रोजगार संधी (ग्रीन जॉब्स)” या विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री. नितीन माळी यांनी “भू-स्थानिक तंत्रज्ञान, ड्रोन मॅपिंग आणि भू-माहिती प्रणाली (जी.आय.एस.)” या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटी श्री. गणेश बुरांडे यांनी “भू-माहिती प्रणाली आणि त्यातील रोजगाराच्या संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना करिअरविषयक दिशा दिली. सत्रानंतर विद्यार्थ्यांसोबत संवाद व चर्चा सत्रही आयोजित करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी (दि. १८ मार्च) अनुप्रयुक्त भूगर्भशास्त्र, भू-माहितीशास्त्र व पर्यावरणशास्त्र या क्षेत्रातील करिअर संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये श्री. भानुचंद्र कोल्प्याक (वरिष्ठ भूवैज्ञानिक, जी.एस.डी. ए. कोल्हापूर), प्रा. सुमित मुळे (वाई.सी. कॉलेज, कराड), श्री. शुभम यादव (संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, क्वांटॉक्स टेक्नॉलॉजीज, सांगली) आणि सौ. सुप्रिया निशानदार (राज्य समन्वयक, पर्यावरण शिक्षण केंद्र – सी.ई.ई, पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचा समारोप प्रमुख अतिथी डॉ. मुस्ताक शेख (वरिष्ठ भूवैज्ञानिक, जी.एस.डी. ए, सोलापूर) यांच्या उपस्थितीत होणार आहे. या ब्रिज कोर्स आयोजनासाठी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.








Post a Comment
0 Comments