मांगले गावचा अनोखा उपक्रम; पावसासाठी मंगलनाथ चरणी साकडे
वारणा नदीत स्नान करून कळशीतून आणलेले पाणी मंगलनाथाच्या गाभाऱ्यात भरले; दुष्काळ हटवून पाऊस पडण्याची ग्रामस्थांची प्रार्थना
शिराळा - प्रतिनिधी.
गेल्या काही महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि गावासह संपूर्ण राज्यावर वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी, यासाठी मांगले ग्रामस्थांनी आपल्या पारंपरिक श्रद्धेप्रमाणे अनोखा धार्मिक उपक्रम राबविला. दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी 8 वाजता मांगले गावचे ग्रामदैवत श्री. मंगलनाथ यांच्या चरणी पावसासाठी साकडे घालण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. सुरुवातीला ग्रामदैवताच्या उत्सव मूर्तीसह संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे वारणा नदीकडे प्रस्थान केले.वारणा नदीच्या पात्रात ग्रामस्थांनी स्नान केले. त्यानंतर उत्सव मूर्तीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. आरतीनंतर ग्रामस्थांनी आपापल्या कळशीत वारणा नदीचे पाणी भरून ते पाणी ग्रामदैवत श्री. मंगलनाथ मंदिरात आणले.ग्रामदैवताच्या मंदिरात आणलेल्या या पाण्याने मंगलनाथाच्या गाभाऱ्यात पाणी भरण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मनोभावे प्रार्थना करत, “राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, शेतकऱ्यांना दिलासा मिळू दे आणि लवकरात लवकर सर्वत्र समाधानकारक पाऊस पडू दे,” अशी विनवणी श्री. मंगलनाथाच्या चरणी केली.मांगले गावातील या पारंपरिक उपक्रमातून ग्रामस्थांची श्रद्धा, एकजूट आणि शेतकऱ्यांविषयीची आस्था दिसून आली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचे भाव उमटावेत आणि शिवार हिरवेगार व्हावे, अशी सामूहिक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“मंगलनाथाच्या चरणी केलेली ही सामूहिक प्रार्थना स्वीकारली जाऊन वरुणराजाचे आगमन व्हावे आणि संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments