Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

रयत : आमच्या कुटुंबाला जोडणारी तीन पिढ्यांची संस्कारवेल

 

रयत : आमच्या कुटुंबाला जोडणारी तीन पिढ्यांची संस्कारवेल

४ ऑक्टोबर: रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सामान्य, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याच्या ध्येयातून पेटवलेली शिक्षणज्योत आज असंख्य पिढ्यांच्या जीवनाचा प्रकाश बनली आहे. माझ्यासाठी    रयत ही केवळ एक शिक्षणसंस्था नाही; ती आमच्या कुटुंबाच्या शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणिवांना जोडणारी भावनिक नाळ आहे.माझी आई आणि माझे दोन्ही मामा रयतच्या शैक्षणिक वातावरणात शिकले आणि पुढे याच संस्थेतकार्यरत राहिले. आज ते सेवानिवृत्त झाले आहेत; मात्र रयतशी जोडलेल्या आठवणी, विद्यार्थ्यांविषयची आपुलकी आणि शिक्षणाबद्दलची बांधिलकी आजही त्यांच्या मनात तितकीच जिवंत आहे. "धनिनीच्या बागेतील" त्यांच्या शिक्षणाच्या आठवणींपासून ते रयतमधील त्यांच्या कार्यापर्यंतचा प्रवास आमच्या कुटुंबासाठी केवळ आठवण नसून एक अमूल्य शैक्षणिक वारसा आहे.या वारशाचा पुढचा धागा माझ्या आणि माझ्या बहिणीच्या शिक्षणातून जोडला गेला. आम्ही आण्णासाहेब कल्याणी विद्यालय आणि महाराजा सयाजीराव विद्यालयात, तर पुढील शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सातारा तसेच रयत शिक्षण संस्थेच्या संजय भैरवनाथ काळे विद्यालय व श्रीमंत छत्रपती शाहूराजे भोसले ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड  ॲग्रीकल्चर, तासगाव येथे घेतले. त्यामुळे आई आणि माझ्या दोन्ही मामांनी अनुभवलेली रयत आम्हीही विद्यार्थी म्हणून अनुभवली. एका पिढीने रयतमध्ये शिक्षण घेतले, पुढे त्याच संस्थेत कार्य केले आणि त्यानंतरच्या पिढीनेही त्याच ज्ञानपरंपरेत शिक्षण घेतले हा आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा वारसा आहे.या नात्याला माझ्या वैवाहिक आयुष्यातही एक सुंदर विस्तार मिळाला. माझे पती डॉ. विनायक धुळप यांचे महाविद्यालयीन शिक्षणही रयत शिक्षण संस्थेतूनच झाले आहे. त्यामुळे रयतशी माझे नाते केवळ माहेरापुरते मर्यादित राहिले नाही; माझे माहेर आणि सासर या दोन्ही परिवारांना जोडणारा समान दुवा रयत ठरली आहे. आमचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवारातील अनेक जण आमच्या शैक्षणिक प्रवासातून प्रेरणा घेत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.रयतच्या या संस्कारातून घडताना शिक्षण माझ्यासाठी केवळ पदवी मिळविण्याचे साधन राहिले नाही. पुढे कृषी व्यवसाय व्यवस्थापनातील MBA (ABM)., MBA (HR)., LLB (University of Mumbai) आणि व्यवस्थापन विषयामध्ये Ph.D. असा शैक्षणिक प्रवास करताना माझ्या संशोधनाचा विषय ‘Study of Agriculture Commodity Markets for Future Trading in India’ हा होता. UGC-NET आणि UGC- नेता JRF आणि SRF सारख्या पात्रता मिळवत शिक्षण, संशोधन आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाताना विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संधी, आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळावी, हा दृष्टिकोन माझ्या कार्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.मागे वळून पाहताना जाणवते आई आणि माझ्या दोन्ही मामांनी रयतचा वारसा आम्हाला दिला; रयतने त्या वारशाला शिक्षणाची दिशा दिली आणि शिक्षणाने आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी दिली. म्हणूनच आमच्यासाठी रयत म्हणजे केवळ शाळा-महाविद्यालयांची साखळी नाही; ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी मूल्यांची शिदोरी आहे.आज शिक्षणाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना नव्या कौशल्यांची गरज आहे. मात्र या प्रगतीसोबत माणूस घडविणारे मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सर्वांना समान संधी तितकीच आवश्यक आहे. सामान्य कुटुंबातील मुलांनाही मोठी स्वप्ने पाहता यावीत आणि ती साकार करण्यासाठी शिक्षणाचा भक्कम आधार मिळावा हीच कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल.रयतने एका पिढीला शिक्षण दिले, त्या पिढीने पुढच्या पिढीला घडवले आणि आजही ही ज्ञानपरंपरा पुढे चालू आहे. हीच रयतची खरी कमाई आणि महाराष्ट्राची शैक्षणिक संपत्ती आहे.म्हणूनच रयतच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या मनातील भावना एका वाक्यात सांगता येईल....

“रयतने आमच्या कुटुंबाला केवळ शिक्षण दिले नाही; तिने आमच्या माहेर आणि सासर या दोन्ही परिवारांना जोडणारी संस्कारांची शिदोरी दिली आणि पुढच्या पिढ्यांना स्वप्ने पाहण्याची दृष्टी दिली.”

रयत शिक्षण संस्थेला स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ज्ञानाची ही ज्योत अशीच पिढ्यान्‌पिढ्या प्रज्वलित राहो.

डॉ. प्रियांका विनायक धुळप (माने)

Visiting Assistant Professor

Lead – Business Development, BHUMI – Bharat Harit Urja Management & Innovations Pvt. Ltd. (India & Germany)Ph.D. (Management) | UGC-NET & JRF | Legal Studies (LL.B.)

Post a Comment

0 Comments