मुस्लिम समाजाच्यावतीने ज्ञानेश्वरी पारायणात संतपंगत.
उंडाळे - प्रतिनिधी.
येथील मुस्लिम समाजाने ज्ञानेश्वरी पारायणात संतपंगतीचे आयोजन करत पारायणातील वारकरी, भाविक ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप केले आणि भारतीय संस्कृती मधील हिंदू मुस्लिम ऐक्याच्या परंपरेला नवा उजाळा दिला. धार्मिक सलोखा आणि एकात्मता जपण्यासाठी येथील मुस्लिम बांधवांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तालुका पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड उदयसिंह पाटील उंडाळकर, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड आनंदराव पाटील, यांनी या उपक्रमास उपस्थित राहुन गावच्या एकोप्याबद्दल कौतुक केले. सध्या येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या दरम्यान अनेक भाविकांकडून पारायणातील वारकरी व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. येथील मुस्लिम समाजातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन सप्ताहाच्या एका दिवशी संपूर्ण गावाला आणि बाहेरील भाविकांना महाप्रसाद देण्याचे निश्चित केले.स्वच्छता आणि वारकरी सांप्रदायाच्या नियमांचे आणि परंपरेचे पालन करत , शुद्ध सात्विक आणि शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजन बनवण्यापासून ते भाविकांनाआग्रहाने वाढण्यापर्यंत सर्व कामांमध्ये मुस्लिम बांधवांनी स्वतःला झोकून दिले होते. ' मानव सेवा हीच ईश्वर सेवा' हा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.पारायण मंडळातील महाराज, कीर्तनकार आणि वारकरी यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. जेव्हा मुस्लिम बांधव पांढरी टोपी घालून, हातात पाण्याचे जग घेऊन वारकऱ्यांच्या पंगतीत सेवा करत होते, तो क्षण संपूर्ण गावाला भावुक करून गेला. एका बाजूला मंदिरातील टाळ-मृदंगाचा गजर आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम बांधवांची ही निस्सीम सेवा, यातून खऱ्या अर्थाने 'माणुसकीचा धर्म' अधोरेखित झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त करत मुस्लिम समाजाचे आभार मानले. "उंडाळे परिसरात जात-पात आणि धर्माच्या भिंती कधीच नव्हत्या आणि आजच्या कार्यक्रमाने ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे," अशी भावना यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली. या प्रसंगामुळे गावातील एकोपा आणि परस्परांबद्दलचा आदर अधिक दृढ झाला आहे. सध्याच्या काळात जिथे समाजात लहान-सहान कारणांवरून दुरावा निर्माण होतो, तिथे उंडाळे गावातील मुस्लिम बांधवांनी समाजा समोर ठेवलेला हा आदर्शसंपूर्ण परिसरासाठी दीपस्तंभ ठरेल. धार्मिक सलोख्याचा हा सुगंध भारतीय संविधानाने दिलेल्या धर्म निरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या तत्त्वांना समाजात रुजवण्यास सहाय्यभूत ठरेल. अशी भावना एवढ्या अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुस्लिम समाजातील सर्वांनी यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments