दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार : सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील
कराड - प्रतिनिधी.
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सभापती माननीय ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्या समवेत दिव्यांग विकास आघाडीच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीस सातारा जिल्हा दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष दीपक खडग, उपाध्यक्ष सर्जेराव देसाई, अविनाश कुलकर्णी, सुरेश माने, बबन गवळी यांच्यासह जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी दिव्यांगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.
“सातारा जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग बांधव शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये,यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व योजना पात्र दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यात येतील,”असे त्यांनी स्पष्ट केले.दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल, असेही सभापती महोदयांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे.दिव्यांग विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील यांचे आभार मानत, दिव्यांगांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments