बळीराजा पाणंद रस्ता व मुख्यमंत्री मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता योजनेची आढावा बैठक संपन्न.
शिराळा -प्रतिनिधी.
बळीराजा पाणंद रस्ता व मुख्यमंत्री मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता योजनेचा आढावा बैठक आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .प्रांत कार्यालय, इस्लामपूर येथे बळीराजा पाणंद रस्ता योजना व मुख्यमंत्री मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत मतदारसंघातील सर्व प्रलंबित पाणंद रस्त्यांची तात्काळ मोजणी, मॅपिंग पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना करण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. पाणंद रस्त्यांमुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होते, उत्पादन खर्च कमी होतो, शेतीकामासाठी यंत्रसामग्री सहज पोहोचते तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणंद रस्त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी विविध गावांतील पाणंद रस्त्यांबाबत आलेल्या अडचणी, मोजणी प्रक्रियेतील प्रश्न तसेच कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस शिराळा तहसीलदार शामला खोत-पाटील, इस्लामपूर तहसीलदार सारिका रासकर, भूमी अभिलेख विभागाच्या माळी मॅडम तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेतकरी हितासाठी पाणंद रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments