Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

सामाजिक न्याय दिनी शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी उत्साहात

 सामाजिक न्याय दिनी शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी उत्साहात

दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांकडून अभिवादन

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : ‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्या वतीने दसरा चौक येथे समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

समता दिंडीचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. पालकमंत्री आणि मान्यवरांनी समता दिंडीच्या पालखीला खांदा दिला. यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा सुषमा सातपुते, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी अमित घवले, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री जाधव तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे उपस्थित होते. तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 

दरवर्षी 26 जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या कारकीर्दीत शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची तत्त्वे प्रत्यक्षात आणत मागासवर्गीय, दिव्यांग, वृद्ध, निराधार आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर राहावा आणि कोल्हापूर ही त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने हा दिवस विशेष उत्साहात साजरा करण्यात आला.

समता दिंडीने व्हीनस कॉर्नर, माईसाहेब पुतळा, बिंदू चौक येथे महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर महानगरपालिका परिसरातील भारतरत् डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंगाराम कांबळे स्मारक येथे अभिवादन करून सी.पी.आर. मार्गे दसरा चौक मैदानात दिंडीची सांगता झाली.

समता दिंडीत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळा तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, लेझीम पथके, हलगी वादन तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ यांमुळे दिंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. महामानवांच्या साहित्याने सजलेली ग्रंथपालखीही विशेष लक्षवेधी ठरली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, तृतीयपंथी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय, सी.पी.आर. रुग्णालय, वाहतूक शाखा, महानगरपालिका स्वच्छता विभाग, पत्रकार, एनएसएस व एनसीसी स्वयंसेवक, विविध तालमी, तरुण मंडळे, बचतगट तसेच जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी झाले. समता दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी सर्व सहभागींचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments