पोफळज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
सोलापूर - प्रतिनिधी.
करमाळा तालुक्यातील पोफळज येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्षातून दोन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे १००० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून अनेकांचे प्राण वाचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात रक्तदानाबाबत जागृती निर्माण होत असून, अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आयोजकांनी व्यक्त केली. तसेच तालुक्यातील इतर उत्सव समित्यांनीही जयंती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशा आदर्श सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आयुष्यमान कार्ड नोंदणी, गरोदर मातांची तपासणी, बी.पी. तपासणी, बाल आरोग्य तपासणी, शुगर व हिमोग्लोबिन तपासणी आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
तसेच याच दिवशी सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीनंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे जयंती उत्सवाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment
0 Comments