Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

जातेगावातील महारवतन जमिनीवर ७.४३ कोटींचे बेकायदेशीर कर्ज; उच्चस्तरीय चौकशीची भीम आर्मीची मागणी.

 जातेगावातील महारवतन जमिनीवर ७.४३ कोटींचे बेकायदेशीर कर्ज; उच्चस्तरीय चौकशीची भीम आर्मीची मागणी.

गोंडावना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

करमाळा तालुक्यातील मौजे जातेगाव येथील महारवतन जमिनीवर बेकायदेशीररित्या नावे दाखल करून त्यावर तब्बल ७ कोटी ४३ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना मार्फत तहसीलदार करमाळा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर जिल्हा सीमेवरील मौजे जातेगाव (ता. करमाळा) येथील सर्व्हे क्रमांक ८ व १० मधील गट क्रमांक ८/१ व ९/१ ही जमीन महारवतन स्वरूपाची आहे. मात्र स्थानिक पुढाऱ्याने बेकायदेशीररित्या संतोष गोरख वारे, राणी संतोष वारे तसेच लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा बहुउद्देशीय संस्था, जातेगाव (ता. करमाळा) तर्फे अध्यक्ष संतोष गोरख वारे यांच्या नावाने नोंदी करून त्यावर जनता सहकारी बँक लि., धाराशिव शाखेकडून तब्बल ७ कोटी ४३ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.महारवतन जमिनीच्या संदर्भात असा व्यवहार करणे नियमबाह्य असून हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पुण्यातील पार्थ पवार यांच्या महारवतन जमीन प्रकरणासारखा हा प्रकार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशा प्रकारे महारवतन जमिनी हडप झाल्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.त्यामुळे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जातेगाव येथील गट क्रमांक ८/१ व ९/१ या महारवतन जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यात यावा. तसेच ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्या वर्ग–१ च्या जमिनीवर ७ कोटी ४३ लाख रुपयांचा बोजा टाकण्यात यावा आणि जमिनींचे मूळ मालकांना त्या परत देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.तसेच या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर बेकायदेशीररित्या नावे नोंद करणारे दुय्यम निबंधक, तहसीलदार, मंडळ अधिकारी, गावकामगार तलाठी तसेच संबंधित बँकेचीही उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तहसील कार्यालय करमाळा येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे.



Post a Comment

0 Comments