Type Here to Get Search Results !

/*-- Don't show description on the item page --*/
/*-- If we are replacing the title, force it to render anyway, and it'll be hidden in CSS. --*/ GONDWANA NEWS.

महिला महाविद्यालय कराड येथे ‘कविता जगताना’ व्याख्यानातून मराठी भाषा गौरव दिन साजरा.

 महिला महाविद्यालय कराड येथे ‘कविता जगताना’ व्याख्यानातून मराठी भाषा गौरव दिन साजरा.


कराड : प्रतिनिधी.

 महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन २०२६ निमित्त “कविता जगताना” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीत आणि विश्वकोश गीताने करण्यात आली. या गीतांनी सभागृहात आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध कवी व प्राध्यापक प्रा. सुमित गुणवंत उपस्थित होते. त्यांनी बी.कॉम., एम.ए. (मराठी), नेट पात्रता प्राप्त केली असून सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे पीएच.डी. संशोधन करत आहेत. त्यांच्या साहित्य योगदानासाठी त्यांना केशवसुत काव्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, मसाप साहित्य पुरस्कार, यशवंत मनोहर काव्य पुरस्कार, परिवर्तनवादी पुरस्कार, अशोक काव्यभूषण पुरस्कार, समर भूषण साहित्य पुरस्कार (मुंबई) अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध साहित्य संमेलने, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या व्याख्यानांचे व कवितावाचनाचे सादरीकरण सातत्याने होत असते. त्यांच्या लेखनाचा ठसा वर्तमानपत्रे, साहित्यिक अंक तसेच सोशल मीडियावर उमटलेला आहे.

कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहाय्यक संपादक श्री. सागर कांबळे यांनी मराठी विश्वकोशाची ओळख करून देताना त्याची निर्मिती, इतिहास आणि ज्ञानपरंपरेतील महत्त्व स्पष्ट केले. विश्वकोश निर्मितीची परंपरा, विविध खंडांची माहिती तसेच मराठी ज्ञानसंपदेचे जतन करण्यामागील उद्देश त्यांनी प्रभावीपणे मांडला. “वेद सर्वांसाठी खुले व्हावेत” ही भूमिका मांडणारे लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच कुसुमाग्रजांच्या साहित्यामुळे मराठी भाषेचा गौरव वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर प्रमुख वक्ते प्रा. सुमित गुणवंत यांनी “कविता जगताना” या विषयावर हृदयस्पर्शी सादरीकरण केले. आपल्या कवितांमधून त्यांनी प्रेम, समर्पण आणि त्याग यांसारख्या जीवनमूल्यांचे सुंदर दर्शन घडवले. “भाषा टिकवण्याचे खरे काम आई करते” या विचारातून त्यांनी मातृत्व आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या खणखणीत आवाजातील कवितावाचनाने सभागृहातील श्रोत्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले.

यावेळी महिला महाविद्यालयातील बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी पूजा कृष्णात नलवडे हिने कुसुमाग्रजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बल्लाळ होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी महाविद्यालयातील साहित्यिक उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले आणि प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींचे विचारविश्व समृद्ध झाल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. रेखा धुळप यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी विभाग प्रमुख प्रा. विलास सुर्वे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

कविता आणि साहित्याच्या ओघात संपूर्ण सभागृहात काव्यमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. अशा उत्साही वातावरणात मराठी भाषा जपण्याचा आणि टिकवण्याचा संदेश देणारा हा सुंदर कार्यक्रम महिला महाविद्यालय, कराड येथे उत्साहात संपन्न झाला.



Post a Comment

0 Comments