पक्ष्यांसाठी पाणी, चाऱ्याची सोय शाळेच्या परिसरात : उंडाळकर विद्यालयाचा उपक्रम
उंडाळे :- शालेय परिसरात पक्षासाठी धान्य, पाणी ठेवताना हरीत सेनेचे विद्यार्थी. समवेत प्राचार्य बी आर पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी व शिक्षक
उंडाळे : प्रतिनिधी.
उन्हाच्या प्रचंड तडाख्याने पक्ष्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन २० मार्च या जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालय ता. कराड, जि. सातारा येथील हरित सेनेचे विद्यार्थी व एस. आर. दळवी फाऊंडेशन व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, संयुक्त विद्यमाने हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी शाळेच्या परिसरात ठिकठिकाणी पाणी, खाद्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढली आहे. निसर्गात पाण्याची कमतरता जाणवू लागलेली आहे. त्यामुळे माणसाबरोबर पशुपक्ष्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याअभावी पक्षी मृत होत आहेत. पाण्यासाठी पशु पक्षी धडपडताना दिसत आहेत. सध्या शिवारात अन्न मिळू लागल्याने पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेण्यास सुरुवात केल्यामुळे हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे.पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळत नाही. त्यांची ही अवस्था पाहून प्राचार्य बी. आर. पाटील, पर्यवेक्षक जे. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी पशुपक्ष्यांसाठी निसर्गात पाणी व खाद्य उपलब्ध केले आहे. यासाठी शाळेच्या परिसरातील झाडावर प्लास्टिकची भांडी पाणी भरून ठेवली आहेत. झाडाच्या सावलीत खाद्य ठेवले आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरांच्या छतावर पाणी ठेवण्याबरोबरच ज्वारीचे कणसे लटकून ठेवले आहेत. जेणेकरून पक्ष्यांना तिथे सहज पोहोचता येईल तसेच धनंजय पवार यांनी परिसरातील विविध गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुठभर धान्य आणण्याचे आवाहन केले आहे. हे धान्य शालेय परिसरात ठेवल्यामुळे पक्ष्यांना पाणी व अन्न मिळेल. बी. आर. पाटील म्हणाले, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना खाद्य मिळणे पाणी मिळणे अवघड झालेले आहे. त्या पक्ष्यांची तडफड होत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडे, खिडक्या अशा ठिकाणी पाणी, खाद्य ठेवल्याने पक्ष्यांची सोय झाली असून परिसरात पक्ष्यांचे वास्तव्य वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना पक्ष्यांबद्दल प्रेमभावना जागृत होण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एस.आर. दळवी फाऊंडेशनचे पर्यावरण विभाग प्रमुख धनंजय पवार, शंकर आंबवडे, प्रदीप ओबासे , रवींद्र भोये, अंजली देशमुख, एस. आर पाटील, ए. जे. पाटील, व्ही.के भोसले, ए. जे. सुतार आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हरित सेनेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment
0 Comments