कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे मॉडेल प्रेझेंटेशनचे आयोजन
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी मॉडेल प्रेझेंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध विषयांवरील आकर्षक व माहितीपूर्ण मॉडेल्स सादर केली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि सादरीकरण कौशल्याचा प्रभावीपणे वापर केला. विविध औषधनिर्मिती प्रक्रिया, आरोग्यविषयक संकल्पना तसेच फार्मसी क्षेत्राशी संबंधित विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल्स तयार करून त्यांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, विश्वस्त डॉ. शंतनु गांधी, विश्वस्त डॉ. अशोक जोहरी, सचिव प्रसून जोहरी, खजिनदार प्राजक्ता जोहरी त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मॉडेल्सचे निरीक्षण करून त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होण्यास मदत होते असे मत अध्यक्षा डॉ. उषा जोहरी यांनी व्यक्त केले. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमासोबतच शैक्षणिक व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास चालना मिळाली असल्याचे मत संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments