महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती हीच खऱ्या ज्ञानाची शिदोरी होय:- प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे
कराड - प्रतिनिधी.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम बीए भाग एक व बीकॉम भाग एक विद्यार्थ्यांच्या साठी संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती हीच खऱ्या ज्ञानाची शिदोरी होय. महाविद्यालयीन शिक्षण हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे प्रमुख साधन आहे. विद्यार्थी वर्गात उपस्थित असतील तरच त्यांचा ज्ञानात्मक, भावात्मक व क्रियात्मक पातळीवरती विकास होतो. अध्ययन अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या वरती सर्व प्रकारचे आणि चांगले संस्कार होत असतात. त्यासाठी वाचन मनन चिंतन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आज बीए भाग एक व बीकॉम भाग एक या वर्गात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी दररोज उपस्थित राहून नवनवीन बाबी अवगत करून घेतल्या पाहिजे. एन.एस.एस, एन.सी.सी, खेळ, सांस्कृतिक कलाविष्कार व अध्ययन इत्यादी मध्ये सहभाग घेतला पाहिजे. परीक्षेचा अभ्यास करून पास होणे म्हणजे केवळ शिक्षण नव्हे. अभ्यासाबरोबर इतर अनेक बाबी शिकून सर्वगुण संपन्न होता आले पाहिजे. प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो!
या कार्यक्रमांमध्ये डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. विश्वनाथ सुतार व प्रा. रत्नाकर कोळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अमृता डवरी व विनायक दबडे या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रा. रास्ते उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन माननीय प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी स्वागत केले. तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सारिका लाटवडे यांनी केले तर आभार प्रा. ज्योती धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रा. लक्ष्मण दोडमणी,प्रा. संदीप तुपे, शिक्षकेतर कर्मचारी श्री. पंकज कुंभार व श्री. वसंत कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Post a Comment
0 Comments