वडगांव हवेली येथे अझोला जैवखत निर्मिती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक संपन्न.
कराड :- प्रतिनिधी.
वडगाव हवेली, ता. कराड : यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, कराड यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) आणि कृषी औद्योगिक संलग्न उपक्रम कार्यक्रमांतर्गत वनस्पती रोगशास्त्र (Plant Pathology) विषयाअंतर्गत वडगाव हवेली येथे "अझोला जैवखत निर्मिती तंत्रज्ञान" या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अझोला बेड तयार करण्याची पद्धत, माती टाकणे, शेणखताची स्लरी तयार करणे, सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) चा वापर, अझोला मातृसंस्कृती सोडणे, पाण्याची योग्य पातळी राखणे तसेच अझोलाची देखभाल, काढणी व जैवखत म्हणून त्याचा उपयोग याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अझोला हे कमी खर्चात तयार होणारे प्रभावी जैवखत असून त्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते, रासायनिक खतांचा वापर कमी होतो तसेच भात पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. याशिवाय अझोलाचा पशुखाद्य म्हणूनही प्रभावी उपयोग होतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रात्यक्षिकासाठी यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय, कराडचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संग्राम धुमाळ, सहयोगी अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. उमराव बोंदर , कार्यक्रम समन्वयक डॉ. योगेश कांदळकर, केंद्रप्रमुख डॉ. कैलास काळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना ताठे,तसेच वनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञ डॉ. स्नेहल जुकते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या सानिका ढोकरे, दीक्षा फडतरे, संकष्टी गौंड, साक्षी काईंगडे,प्रतिमा कांबळे, अनिता खरात, गीतांजली निंबाळकर, सानिया पठाण व संस्कृती शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर अझोला जैवखत निर्मिती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाबाबत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला व प्रात्यक्षिकास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Post a Comment
0 Comments