भूशास्त्र संकुलातील ‘करिअर होरायझन्स २०२६’ ब्रिज कोर्सचा यशस्वी समारोप.
विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा
सोलापूर - प्रतिनिधी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलामार्फत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएम-उषा) अंतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘करिअर होरायझन्स २०२६’ ब्रिज कोर्सचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अनुप्रयुक्त भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भू-माहितीशास्त्र या क्षेत्रांतील आधुनिक करिअर संधी, संशोधन दिशा आणि आवश्यक कौशल्यांविषयी सखोल मार्गदर्शन मिळाले.
हा द्वितीय ब्रिज कोर्स मा. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर आणि मा. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए), महाराष्ट्र शासन, सोलापूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुस्ताक शेख उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून कॉन्टॅक्टस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष श्री. शुभम यादव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप होते. यावेळी समन्वयक प्रा. महेश कंदी व प्रा. सिद्धाराम चौगुले यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख अतिथी डॉ. मुस्ताक शेख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये भूगर्भशास्त्र, भू-माहितीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या तीनही विषयांचा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे विषय विविध क्षेत्रांत प्रभावीपणे कार्यरत असून विकासाच्या प्रक्रियेला गती देतात. सध्याच्या काळात अभ्यासक्रम समान असला तरी स्पर्धा परीक्षांमधील मूल्यमापन पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील संकल्पना सखोल समजून घेत आत्मविश्वासाने, सातत्याने आणि प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राष्ट्रीय पात्रता परीक्षा, राज्य पात्रता परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तसेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश निश्चित मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी आपला परिचयपत्र (बायोडाटा) नियमितपणे अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक असून, दर तीन महिन्यांनी त्यात सुधारणा करावी, असे त्यांनी सांगितले. विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कौशल्याधारित अभ्यासक्रम तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबर पूरक अभ्यासक्रम पूर्ण केल्यास ज्ञानवृद्धी होऊन रोजगाराच्या संधी वाढतात, असे त्यांनी नमूद केले. या ब्रिज कोर्सचे आयोजनही विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत दिशा देण्यासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विनायक धुळप यांनी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विविध अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, परिषद व कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपले कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि मजबूत व्यावसायिक संपर्क जाळे निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत असून, त्याचाच एक भाग म्हणून या ब्रिज कोर्सचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठामार्फत विविध सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव (ऑन-जॉब प्रशिक्षण) उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी झालेल्या सत्रांमध्ये तज्ज्ञांनी पर्यावरण, भू-माहितीशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करिअर घडवण्याच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कोर्स संदर्भात विद्यार्थ्यांमधून सत्यम अवसेकर आणि विशाखा तेनहळीकर यांनी कोर्सबाबत सकारात्मक अभिप्राय नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना तसेच संकुलातील शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतिश धेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सिद्धाराम चौगुले यांनी केले. या ब्रिज कोर्स कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी साठी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांची मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
सोलापूर:- ‘करिअर होरायझन्स २०२६’ ब्रिज कोर्सच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. मुस्ताक शेख, संचालक डॉ. विनायक धुळप, विशेष अतिथी श्री. शुभम यादव तसेच समन्वयक प्रा. महेश कंदी व प्रा. सिद्धाराम चौगुले.




Post a Comment
0 Comments