महिला जेव्हा ज्ञान विज्ञान,तंत्रज्ञान स्वीकारतात तेव्हा जग बदलून टाकतात
_____मा. गौरी चव्हाण
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, महिला सबलीकरण व लैंगिक समानता समिती आणि सांस्कृतिक विभाग यांचे वतीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन संपन्न झाला. या दिनाच्या निमित्ताने "कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील महिलांची भूमिका आणि संधी" या विषयावरती आयोजित व्याख्यानाच्या प्रमुख मार्गदर्शक माननीय गौरी चव्हाण होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या, महिला जेव्हा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान स्वीकारतात तेव्हा जग बदलून टाकतात! भारतीय संस्कृतीने स्त्रियांना मानाचे स्थान दिलेले आहे. प्रत्यक्ष समाजात मात्र प्राचीन काळापासून स्त्रियांचे जगणे पुरुषप्रधान संस्कृतीच्या दबावाखालीच असल्याचे दिसते. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोलाचे आहे. या पती-पत्नींनी स्त्रियांच्या वरील अन्यायाला वाचा फोडली.आज 21 व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे. अनेक संधी महिलांच्या समोर आहेत यामध्ये डिजिटल मार्केटिंग, मशीन प्रशिक्षण, यु ट्युब व्हिडिओ, झूम क्लासेस, डेटा विश्लेषण, हस्तकलेसारख्या उत्पादनांचा इन्स्टाग्राम, व्हाट्सअप च्या माध्यमातून ग्राहक शोधणे, इत्यादी बऱ्याच बाबी महिलांना करता येतील. आज महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, आज एकविसाव्या शतकात पुरुषांनी ज्या क्षेत्रात अधिपत्य निर्माण केले आहे. त्या सर्व क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले आहे. शिस्त, करारीपणा या बाबी महिलांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. समाजात पुरुषांचे अस्तित्वच स्त्रियांच्यावर अवलंबून आहे. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत पुरुषाला स्त्री ची साथ असते. सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या अन्याय अत्याचारावरती परिवर्तन चळवळ राबवली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कांना हिंदू कोडबिलासारख्या विधेयकातून कायद्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन करून महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिला भगिनींचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महिलांच्या विषयी प्रा. सचिन बोलाईकर व प्रा. सोनाली रांगोळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत परिचय डॉ. सुभाष कांबळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. सुरेश यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.


Post a Comment
0 Comments